माझ्या नजरेतून…!
Through My Eyes…!
एका “पॅसेंजर” चा प्रवास…
झुक झुक झुक झुक अगीन-गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहूया… मामाच्या गावाला जाऊया…
लहानपणी आपण सर्वांनीच ही कविता ऐकली आहे, गायली आहे अणि अनुभवलीसुद्धा आहे. रेल्वेची क्रेझ कोणाला नसते? लहानपणात भोंगा वाजवत येणारी, धुरांचे ढग हवेत सोडणारी रेल्वे बघण्याचे वेड असते तर मोठेपणीसुद्धा रेल्वेमध्ये बसायला एक वेगळीच मजा येते. नुकताच माझा रेल्वे प्रवासाचा योग घडला. कऱ्हाड ते सांगली असा छोटासाच प्रवास होता.
पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील कऱ्हाड हे एक स्टेशन. माझे मूळ गाव. येथून सांगली २ तास. बऱ्याच ट्रेन थांबतात इथे पण पहाटे येण्याऱ्या सातारा-कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव. सर्व प्रकारची लोकं बघायला मिळतील तुम्हाला या गाडीत. रविवारी पहाटेच मी आणि माझी बायको कऱ्हाड स्टेशनला आलो. साडे सहाची गाडी. तिकीट काढून झाले होते, अजून १०-१५ मिनिटे वेळ होता. म्हणून एक चहा घ्यावासा वाटला. रेल्वे-स्टेशन वर मिळणारा चहा म्हणजे एक अलगच मिश्रण असते. उकळलेल्या साखरेच्या अतिगोड पाण्यात नावापुरती चहापत्ती. पण तरीसुद्धा हे आवडीने पिणारी लोकं. तर असा खडाचम्मच चहा पिऊन पहाटेची झोप घालवायचा माझा प्रयत्न “सक्सेसफुल” झाला. कधी नव्हे ते माझे निरीक्षणवादी मन जागे झाले अन नजर इकडे-तिकडे फिरू लागली. तसे कऱ्हाडचे स्टेशन शांतच असते. कसली गडबड नाही गोंधळ नाही. लोकांची भाऊगर्दी नाही. काही ठराविक ट्रेन इथे थांबत असल्याने तेवढ्यापुरता थोडा गजबजाट होतो. अशाच एका गजबजाटाच्यावेळी आम्ही इथे होतो. कऱ्हाड आणि आसपासच्या लोकांना किर्लोस्करवाडी, सांगली अशा ठिकाणी कामावर जायला सोयीची अशी ही पहाटे येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजर. पण आज रविवार. त्यामुळे म्हणावी तेवढी गर्दी नव्हती. रात्री उशिरा स्टेशनवर उतरलेली माणसे अजून बाकड्यांवर झोपेतच होती. स्वच्छता कामगार प्रामाणिकपणे कचरा गोळा करत फिरत होते. एक-दोन पेपरवाले त्यांचे दुकान मांडायच्या तयारीत होते. स्टेशनमास्तर त्यांच्या खोलीमध्ये देवासमोर उदबत्ती फिरवत होते. बहुधा नुकतीच त्यांची झोपमोड झाली असावी. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याने घंटा वाजवून रेल्वे येत असल्याची वर्दी दिली (अजूनही कऱ्हाड स्टेशन मध्ये रेल्वे येताना घंटा वाजवली जाते). मग एकदा आधुनिकरित्या अनौंसमेंट झाली तशी सगळ्यांची फलाटावर गर्दी जमायला लागली. जोरदार भोंगा वाजवत गाडी स्टेशन मध्ये शिरून स्थिरावली. लोकांनी भराभर चढून जागा पटकावल्या. मी आणि बायको समोरासमोर खिडकीशेजारी बसून घेतले. वाह… लहान मुलासारखे माझे मन रेल्वेत बसल्यावर फुलून गेले होते. परत एकदा भोंगा वाजवून गाडीने वेग घ्यायला सुरवात केली.
गाडीत फारशी गर्दी नव्हतीच त्यामुळे लोक निवांत पाय पसरून बसले होते. आमच्या डब्यात चार मुलांचा एक ग्रुप बसला होता. कॉलेजमधील मुले असावीत ती. कऱ्हाडनंतर शेणोली स्टेशन येते. जवळ-जवळ १५ मिनिटे गाडी पळत होती. बाहेर नुकतेच तांबडे फुटायला लागले होते. सगळीकडे नुसती उसाची शेती दिसत होती. शेणोली स्टेशन मध्ये गाडी थांबताच एकदम कलकलाट करत बायका-पोरांचा एक जथ्था गाडीत चढला. बहुतेक प्रत्येक डब्यात हेच चित्र दिसले. स्टेशनवर सुद्धा अजून बरेच लोक चढण्यासाठी दारापाशी थांबले होते. एवढे सारे लोक कुठे चाललेत? आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. बहुतेक पुढच्या गावात मोठ्या पार्टीचे लग्न असावे. नंतर प्रत्येक स्टेशनवर एवढाच लोंढावर चढत होता. शेवटी मी न राहवून एक माणसास विचारले.
“काय हो मामा, एवढी लोकं कुठे चालली?”
“मायाक्काची जत्रा हाय. चिंचलीला.”
“मग कुठपर्यंत जाणार?”
“मिरजेला बदलायची गाडी. कर्नाटकात जायाचे हाय.”
चला. म्हणजे सांगलीपर्यंत करमणूक आहे तर. रेल्वेमधला प्रवास म्हणजे नाना प्रकारची व्यक्ती आणि वल्ली भेटतात. त्यातून जत्रेला जाणारी लोकं म्हणजे विचारू नका. जसजशी गाडी वेग धरत होती तसे बायकांचे आवाज वाढत चालले होते. मग कोणाच्या तरी लग्नातल्या गोष्टी, कोणाच्या नवऱ्याबद्दल, नाहीतर अंथरुणावर खिळलेल्या म्हातारीबद्दल. या बायका कशावरही चर्चा करू शकतात चुलीपासून मुलीपर्यंत. एका स्टेशनवर आमच्या डब्यात काही पुरुष मंडळी चढली. बसायला जागा नव्हतीच. बर्थवर लोकांऐवजी कोणाचे सामान, बारदाणे आणि कोपऱ्यात लहान पोरे झोपवलेली. तेवढ्यात एका गड्याचे बाईशी भांडण झाले. जागेवरून.
“अरं ए भाड्या… तिकडे बस की बाप्या मंडळीत. बायकांच्यात कशाला येतोय मोरावानी.. ” झाले.. हा बाप्या गडी चिडला. अहंकार दुखावला ना त्यांचा.
“तुझ्या नवऱ्याने काय ईकात घेतलीय काय जागा? तिकडं बुड टेकवाय सुदिक जागा नाय म्हणून इथं बसलोय. बायकांच्यात बसायची हौस नाय मला.” वगैरे वगैरे..
त्यांच्यात काहीतरी समझोता झाला असावा. कारण पुढे काही ही भांडी एकमेकांवर आपटली नाहीत. लोकांच्या बोलण्याला रंग चढत होता. पुरुष मंडळी कुठल्यातरी साखर कारखान्याला शिव्या घालत होती. मधुनच एखाद्या पुढाऱ्याचा उद्धार होत होता. महाद्या, आप्पा, भाऊ, शंकऱ्या इत्यादी लोकं कशी वागतात याचीसुद्धा चर्चा झाली. म्हणजे फक्त बायकाच “गॉसिपिंग” करत नाहीत तर!! दारात उभे असलेले तरणेबांड गडी आपले दिशांचे आणि भूगोलाचे ज्ञान पाजळत होते. साताऱ्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेला ते उत्तरेकडे वळवून मोकळे झाले होते. पुढे येणाऱ्या स्टेशनची यादी तयार करत होते. पुढे किर्लोस्करवाडीमध्ये एक आंधळा भिकारी डब्यात चढला. “मिळणार नाही बाबा तुला… आई-बापाची माया” असे कुठलेतरी गाणे तारसप्तकात म्हणत तो भीक मागत होता. ५-१० रुपये जमल्यावर त्याला कोणीतरी पुढच्या स्टेशनवर उतरवून दिले.
“कंचं ठेसन आलं रे पोरा?” अचानक कानापाशी आलेल्या किरट्या आवाजाने मी थोडा गडबडलोच. एक म्हातारी अजून नांद्रे आले नाही खात्री करून घेत होती. बाजूच्या कंपार्टमेंट मधून ओळखीचा “रिक्षावाला” गाण्याचा ताल ऐकू येत होता. देवीच्या जत्रेला जाणाऱ्या बायका रिक्षावाला सारखी गाणी म्हणतात? नीट लक्ष दिले तर देवीचे गीत व्यवस्थित मीटर मध्ये बसवून म्हणत होत्या त्या. आम्ही दोघे हसून फुटायचे बाकी होतो.
नंतर त्याच-त्याच गप्पा आणि बाता ऐकण्यापेक्षा खिडकीतून बाहेर बघावेसे वाटायला लागले. बाहेरची पळणारी झाडे, भराभरा मागे जाणारी गावे बघून मजा वाटत होती. नुकतेच उजाडत असल्याने बऱ्याच गावांमधले लोकं रुळांजवळ “डबे टाकायला” बसले होते. बहुधा रेल्वेचे डबे मोजतानाच त्यांना “डबा टाकायची” सवय असावी. लहान-सहान पोरे गाडीतल्या लोकांना टा-टा करत होती. एका स्टेशनवर गाडी थांबल्यावर वडापच्या रिक्षांची गडबड दिसली. केवळ प्लॅटफॉर्मवर रिक्षा आणता येत नाही म्हणून नाहीतर त्या रिक्षावाल्यांनी तेसुद्धा केले असते. भिलवडी नंतर उसाची शेती कमी होऊन द्राक्षांच्या बागा दिसायला लागल्या. दूरवर फक्त उस आणि द्राक्षे. एखाद्या ठिकाणी पक्ष्यांचा थवा दिसला कि तिथे खाली जोंधळा असणार हे नक्की. मधूनच एखाद्या शेतात खूप सारे मोर दिसत होते. कमाल!!! हिरवाईने नटला आहे हा सारा परिसर. बाहेरची “सिनरी” आणि गाडीच्या डब्यातील “सीन” बघता बघता सांगली कधी आले कळलेच नाही. गर्दीतून काका-मावशी करत आम्ही दारापाशी येऊन उभे राहिलो. विश्रामबाग येताच उतरायचे होते.
स्टेशनवर उतरल्यावर गाडी जाईपर्यंत थांबलो. धुराचे लोट सोडत, हळूहळू वेग धरत गाडी निघून गेली. भोंगा वाजवत जाताना जणू ती सांगत होती “भेटूच परत!!!”. कधी परत येईल हा योग? परत कधी मिळेल असाच आगळा अनुभव?
सांधण व्हॅली
“या वीकेंडला ट्रेकला जायचे” असे ठरवले कि नेमके काहीतरी कारण निघते आणि सगळ्यावर पाणी फिरते (निदान माझ्या बाबतीत तरी). नुकताच प्रचीतगड असाचहुकल्यामुळे मी अज्याला काहीच कमिट करत नव्हतो. तरी सुद्धा त्याने नेटाने “जायचेच” असे ठरवले होते. बरेच दिवसांनी (खरेतर वर्षांनी म्हणायला पाहिजे!!) स्वानंद, अजय आणि मी एकत्र ट्रेकला जाणार होतो. पण सगळे व्यवस्थित घडेल तर तो ट्रेक कसला ना? माझी काही कामं शनिवार दुपारपर्यंत लांबत गेली आणि मुख्य म्हणजे तेल-पाण्यासाठी दिलेली माझी बाईक शुक्रवारी मिळालीच नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी निघायचे ठरले. अजयची चिडचिड झालीच होती. त्यातून भरीत-भर म्हणून बायकोला पटवायचे होते. बाप रे!! फार अवघड असते हे काम. शनिवारी सकाळी लवकर कामं संपवायच्या अटीवर ग्रीन सिग्नल मिळाला. आता “जायचे कुठे?” हा प्रश्न यक्षासारखा समोर उभा ठाकला. या प्रश्नाला उत्तर एकाच ठिकाणी मिळू शकते. google.com. थोडेफार सर्च झाले. सांधणची घळ, नाणेघाट अशी दोन ठिकाणे फायनल झाली. नाणेघाट तर सर्वपरिचित आहेच. सांधणबद्दल पंकज शिवाय कोण चांगले सांगू शकेल? लगोलग त्याच्याशी मेला-मेली झाली. त्याचा ब्लॉग वाचून काढला. सांधण डोक्यात फिट्ट झाले.
शनिवारी सगळी कामे भराभरा संपत गेली. शिवाय बुडाखाली चार चाके पण मिळाल्यामुळे बाईकवर जायचा त्रास वाचला. अजय आणि स्वानंद घरी पोहोचेपर्यंत १ वाजला. ट्रेकचा सापडेल तेवढा संसार गोळा केला गाडीत कोंबला आणि एकदाचे आम्ही बाहेर पडलो. अजय आणि स्वानंदच्या पोटातील कावळ्यांचे हत्ती झालेले, जवळचे म्हणून “लवंगी मिरची” समोर गाडी उभी केली. चिकन चापता-चापता सांधणबद्दल गप्पा झाल्या. अजयच्या “ट्रेकानुभावी” मनाला समजावून एकदाचे निघालो. डेस्टीनेशन सांधण. बराच लांबचा पल्ला होता. वाटेत डझनभर केळी घेतली आणि साडेपाचला संगमनेर असे टार्गेट ठेऊन नाशिक रोड पकडला. मजल-दरमजल करत संगमनेर गाठायला आम्हाला ६ वाजले. आता पुढे अकोले-राजूर-शेंडी-साम्रद असा दोन-अडीच तासाचा रस्ता. वाटेत अकोल्यात शिवजयंतीच्या मिरवणुका जोरदार चालू होत्या. ट्रक्टर-ट्रॉलीच्या मागच्या बाजूला महाराजांची छोट्यात छोटी मूर्ती अणि पुढच्या बाजुस माणुससुद्धा दिसणार नाही एवढ्या उंचीची स्पीकरची भिंत. कोंबडी पळाली, रिक्षावाला वगैरे भक्तिगीतांवर नाचणारे “मावळे” बघून आम्ही धन्य पावलो. मनातूनच महाराजांना वंदन करून राजूरच्या दिशेने निघालो. वाटेत राजूरमध्ये गाडीत पोटात “त्याल” आणि आमच्या घशात एक-एक कटिंग ओतले. शेंडी गावातशिरतानाच काही भक्तगण “अमृतप्राशन” करून कुणाच्याही भक्तीत “टल्लीन” होऊन चालताना दिसले. एका हॉटेलच्या कट्ट्यावर असाच एक भक्तगण ध्यानावस्थेत बसला होता. एका सरळ रेषेत चालणाऱ्या व्यक्तीस गाठून त्याला साम्रदचा रस्ता विचारून घेतला. हरिश्चंद्र-कळसुबाईच्या घनदाट जंगलातून जाताना आमची तोंडे आपोआप गप्प झाली. बिबट्याचा वावर असलेला हा प्रदेश. त्यामुळे बिबट्याचे दर्शन घडेल अशी अपेक्षा करत आम्ही उडदावणे गावात पोचलो. उजवीकडे आडव्या अंगाचा अलंग दिसत होता. गावातल्या शाळेशेजारी गाडी लावली. थोडी लाकडे गोळा करून अजयने चूल पेटवली. मस्त गरम-गरम सूप आणि “maggie” खाल्ली. तिथेच मग आमची “night photography” झाली. एक तासभर कॅमेराला दमवून टेंटमध्ये शिरलो.
रविवारी पहाटेच आम्ही साम्रदच्या रस्त्याला लागलो. वाटेत एका “लई भारी” स्पॉट वर थांबलो. आमचा आचारी उर्फ अजयने चुलीशी बराच वेळ झगडून “आल्याचा चहा” बनवला. सूर्योदयाच्या वेळी आकाशात मस्त रंग पसरले होते. तिथे थोडावेळ आमची कला पाजळून आम्ही साम्रदला पोचलो. गाडी पार्क करून निघेपर्यंत P@P मधला एक मित्र भेटला. श्रीकांत. चला चांगलीच सोबत झाली. गावामध्ये यशवंत बांडे यांच्या घरी चहा घेऊन आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही सांधणच्या दिशेने निघालो. श्रीकांतबरोबर P@P चा अजून एक गडी होता. गिरीश. दोघांनापण फोटोग्राफीची आवड. त्यामुळे आमचा चांगलाच वेळ जात होता. पाण्यातील प्रतिबिंब, गव्हाची शेते, घरे, सोनपंखी(ladybug) वगैरेचे फोटो काढत आम्ही निघालो होतो. श्रीकांतला सांधणची “so called” वाट माहित होती. त्यामुळे आम्ही त्याला वाटाड्याच बनवला होता. पण त्याने एक उच्च जागा दाखवली. मिनी कोकणकडा. सांधणच्या अगदी लगतच. डावीकडे आकाशात घुसलेला रतनगड आणि त्याचा खुट्टा सुळका. खाली हजार फुट खोल दरी आणि कोकणातली छोटी छोटी गावे. दरीतून वर येणारा भन्नाट वारा. समोर आपली अवाढव्यता दाखवणारा आजा उर्फ आजोबा. पुढच्या वेळी इथेच टेंट टाकायचा ठरवून आम्ही सांधणच्या मुखाकडे निघालो. पंधरा-एक मिनिटे चालून आम्ही सांधणच्या प्रसिद्ध घळीत शिरलो. सांधणची घळ म्हणजे पठाराला पडलेली प्रचंड मोठी भेग आहे. मोठमोठ्या खडकातून वाट काढत आम्ही आत शिरत होतो. बाहेरच्या पेक्षा आत बरेच थंड होते. एके ठिकाणी तर आमचा रस्ता पाण्याने अडवला होता. पाण्यातून जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शेवटी फक्त कॅमेरा घेऊन आम्ही पाण्यामध्ये उतरलो. बाप रे!!! बर्फाहून थंड पाणी. त्यातून ते छातीपर्यंत आलेले. पावसाळ्यात इथे येणे म्हणजे मूर्खपणाच ठरणार. शक्य तेवढे लवकर पाण्यातूनबाहेर पडलो. आम्ही जसजसे आम्ही पुढे जात होते तशी ही घळ अरुंद होत चाललेली. फक्त काही ठिकाणीच प्रकाशाची तिरीप येत होती खाली.
थोडाफार क्लीच्क-क्लीच्काट झाला. घळीच्या तोंडापर्यंत पर्यंत गेलो. तिथून दिसणारा “व्हू” म्हणजे कमाल!!! घळीत एक-दोन तास घालवून आम्ही साम्रदला परत आलो. यशवंत बांडेनी सांगितल्या प्रमाणे जेवण तयार ठेवलेच होते. चटकदार कालवण आणि भाकरी. वाह.. त्यानंतर हातसडीच्या तांदळाचा भात. सुख. असे सुंदर जेवल्यावर ढेकर आला नाही म्हणजे नवलच.. थोडा वेळ गप्पा-टप्पा मारून, नंबरची देवाण-घेवाण करून आम्ही रतनवाडीच्या रस्त्याला लागलो. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर खूप पुरातन आहे. अतिशय सुरेख कोरीवकाम आणि काळ्या दगडातील हे मंदिर बघताना मन प्रसन्न होऊन जाते. तिथे परत एकदा आमचे कॅमेरे आणि ट्रायपॉड बाहेर आले. एक तासभर वेळ काढून आम्ही सूर्यास्ताच्या वेळी रतनवाडी सोडली. रतनवाडी-शेंडी रस्ता म्हणजे भंडारदऱ्याच्या पाण्याला वळसा. मागे रतनगडाच्या मागे सूर्य अस्तास गेलेला दिसत होता.
परत येताना आम्ही वेगळा रस्ता निवडला होता. कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा-आळे फाटा. दिवस मावळल्यामुळे आम्हाला या रस्त्याचा आनंद घेता आला नाही. फक्त प्रवासाचा अर्धा-एक तास वाचला एवढेच कौतुक. एक अविस्मरणीय, उच्च, लई भारी ट्रेक चा अनुभव घेऊन आम्ही परत पुण्यात शिरलो.
काही उपयुक्त माहिती:
कसे जाल? पुणे-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी-उडदावणे -अप्पर भाटघर धरण-साम्रद
पुण्याहून अंतर – अंदाजे २३० किमी.
राहण्याची सोय – साम्रद (मारुती मंदिर), उडदावणे (शाळेमध्ये)
खाण्याची सोय – साम्रद मध्ये जेवण्याची सोय होते.
पूर्णपणे दोन दिवस दिल्यास रतनगड सुद्धा पाहता येतो. साम्रदहून रातान्गादास जाता येते. तसेच रतनवाडीहून सुद्धा शिडीची वाट आहे. परतीच्या वाटेवर रतनवाडीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर नक्की बघा.
शिवाय पुण्यास येण्याचा वेळ वाचवण्यासाठी एक वेगळा रस्ता राजूर पासून कोतूळ मार्गे. कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा-आळे फाटा.
कवडी-पाट
अज्या , स्वानंद, विक्रांत. कोणालाच सुट्टी नव्हती (thanks to Barclays).
शेवटी लास्ट ट्राय म्हणून खंड्या ला फोन लावला. तर त्याचं सुरवातच “उद्या सुट्टी. कुठे जायचे का? दुपारपर्यंत येऊ परत.
“वाह.. क्या बात है.. “ठरले तर मग.”
रात्री त्याचा फोन आला आणि कवडी ला जायचे ठरले.पहाटे साडे पाच ला निघायचे नक्की झाले आणि कवडीचा प्लान करत मस्त ताणून दिली.
पहाटे खंड्याला उचलले आणि स्वीकारला मस्त चटणी-पोह्यांवर ताव मारला. पोटाची भूक शांत झाल्यावर कॅमेराची भूक भागवण्यासाठी सोलापूर रोडला गाडी झोकून दिली.
तांबडे फुटायला लागले होते. कवडीच्या रेल्वे क्रोस्सिंगवर थांबून मस्त फोटो सेशन केले. तेवढ्यात दोन “भाविक (photographer)” आपापल्या “लांब-पल्ल्याच्या बंदुका” घेऊन कवडी च्या दिशेने गेले. चला, म्हणजे फक्त आम्ही दोघेच रिकामटेकडे नव्हतो तर. पुढचा रस्ता म्हणजे दुतर्फा उसाची शेती. रात्री उसाला पाजलेल्या पाण्यामुळे सगळीकडे मस्त धुक्याची दुलई पांघरली गेली होती. परत एकदा गाडी थांबली. पूर्वेच्या तांबूस रंगावर धुके अशक्य भारी दिसत होते. अचानक सूर्यरावांचे आगमन होताना दिसले. आम्ही दोघे तसेच शेतात घुसलो आणि सूर्योदयाचे ते अनमोल क्षण टिपायला सुरवात केली. नव-वधू घरात प्रवेश करताना जशी दबकत हळुवार पावले टाकते तसे हे आपले सुर्यनारायण हळुवारपणे माडांच्या पाठीमागून वर येत होते. “कडक्क” फोटो मिळाले. उसाच्या पानावरील दवबिंदू कॅमेरात छापायचा थोडा प्रयत्न झाला पण तो तितकासा सफल नाही झाला. गाडीत बसताना मनात विचार आला “नक्की किती दिवसांनी आपण सूर्योदय बघतोय?”. तोपर्यंत खंड्याची वटवट सुरु झालीच होती. त्याला “खंड्या (kingfisher)” चे फोटो काढायचे होते म्हणून त्याची ही चिडचिड. कारण आधीच्या ट्रीपमध्ये त्याला खंड्याने फक्त “मागलं-दर्शन” दिले होते.
गावातल्या देवळापाशी गाडी लावताना समोर पाटामधले वाफाळणारे पाणी दिसत होते. आमच्या स्वागताला “तारवाला (wire-tailed swallow)” पुलाच्या कठड्यावर बसला होताच. त्याला कॅमेरात टिपायचा प्रयत्न झाला. खाली पाण्यामध्ये काही “brahminy ducks” दगडावर तंद्री लावून बसले होते. तर काही बगळे नाष्ट्यासाठी पाण्यात चोची खुपसत होते. कवडीच्या पाटापलीकडे सुबाभळीचे जंगल आहे. तिथे खूप मोर आहेत असे ऐकले होते म्हणून तिकडे गेलो. पण मोरच काय आम्हाला मोरपिसांचे पण दर्शन घडले नाही. पण एका पोपटाचे हनीमून मात्र बघायला मिळाले. आणि नवरा-बायको प्रमाणे भांडणारे चिमणा-चिमणी सुद्धा होते. तिथेच झाडांमधून सूर्यकिरण जमिनीची वाट शोधात खाली उतरत होते. परत एक निसर्गचित्र. बहुतेक आज आमच्या नशिबात पक्षी नव्हतेच.असो. परत येताना किनाऱ्यावर सावलीला बसून मस्त समोरच्या “brahminy ducks” चे सूर्यस्नान बघितले. एकंदरीत जाणवले कि मुळा-मुठा मधल्या प्रचंड प्रदूषणामुळे कवडीच्या पाटात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण खूपच कमी झालेय. आधी खूप लोकांकडून ऐकले होतेच पण आज दिसले आणि जाणवले सुद्धा.
परत गावात आल्यावर पुलाशेजारी शेण्या वाळवत ठेवल्या होत्या. तिथे सकाळी दिसलेले “भाविक” पोझीशन घेऊन बसलेच होते. त्यांच्या समोर शेण्यामधले किडे वेचण्यासाठी “pied-wagtail”, “yellow-wagtail”, “pipit” वगैरे पक्षी तुरुतुरु पळत होते. तिथे परत एकदा क्लीच्क-क्लीच्काट झाला. “pied-wagtail” ने तर काही सुंदर पोजेस पण दिल्या. त्यामुळे मन जरा शांत झाले. तोपर्यंत खंड्याचे चिखलात झोपून कुठल्यातरी पक्ष्याचे फोटो काढणे चालू होते. यावेळेसही त्याला “खंड्या(kingfisher)” ने हूल दिली होती. पुढच्या वेळी “खंड्याचे” फोटो काढल्या शिवाय परत जायचे नाही असं नेहमी प्रमाणे खंड्याने ठरवलेच होते.
कवडी-पाट चे काही अनमोल फोटो कॅमेरात साठवून आणि डोळे-मन शांत करून आम्ही पुण्याच्या दिशेने गाडी वळवली. पुढच्या वेळी जेव्हा कवडी ट्रीप होईल त्यावेळी आजच्या पेक्षा कमी पक्षी बघायला मिळतील याची खंत मात्र जाणवत राहणार.
काही उपयुक्त माहिती: